पुणे : पर्वती पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. उर्वरित पाच जण पळून गेले. या प्रकरणी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ३) रात्री साडे नऊच्या सुमारास जनता वसाहतकडे जाणाऱ्या पुलाजवळ करण्यात आली.
बसवराज उर्फ अभिषेक उर्फ माया राजेंद्र पाटील (१९, रा. गल्ली नं. १५, जनता वसाहत), अमित शंकर कांदे (२७, रा. गल्ली नं. १८, जनता वसाहत) यांना अटक करुन एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ओंकार उर्फ दाद्या वामन आल्हाट (रा. दांडेकर पुल, पुणे मुळ रा. म्हाडा वसाहत, वैदुवाडी, हडपसर), प्रमोद अंकुश कळंबे (रा. पर्वती दर्शन), अमन झारेकरी (रा. दांडेकर पुल) आणि पृथ्वीराज कांबळे (रा. गल्ली नं. ३ संतोषनगर, कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई अमोल बबन दबडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पोलिस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, कॅनॉल रोडवरील जनता वसाहतकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर काही तरुण हातात कोयते घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिस आल्याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पाचजण कोयत्यासह पळून गेले. तर तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता दांडेकर पूल येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले.