लोणावळा : पावसाळी पर्यटनामुळे शनिवार व रविवारी लोणावळ्यात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी लोणावळा शहरात कार व दुचाकी वगळता सर्व मोठ्या व अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे हे शुक्रवारी शहरातील वाहतूककोंडी समस्येचा आढावा घेण्यासाठी आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे, शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्याकडून पर्यटकांची गर्दी व वाहतूककोंडी याची माहिती घेत लोणावळ्यात शनिवार व रविवार अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला.मोठी वाहने वलवण येथील द्रुतगती मार्गाच्या उड्डाणपुलाखाली व खंडाळा येथे उभी करून सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग पर्यटक करू शकतात. वाहतुकीस अडथळा होईल, अशी वाहने उभी केल्यास वाहनांना जॅमर लावण्यात येणार आहेत. वाहन तपासणी नाक्यांवर ब्रिथ अॅनालायझर मशिनद्वारे चेकिंग करून दारू पिऊन वाहन चालविणारे व तळीरामांवर कारवाई करण्यात येणार आहेत. लेन कटिंग करून व ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)
अवजड वाहनांना लोणावळ्यात प्रवेश बंद
By admin | Published: July 16, 2016 12:44 AM