सावधान! पुणे शहरातल्या विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 01:49 AM2020-07-31T01:49:22+5:302020-07-31T01:50:55+5:30
पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्याचे काम सुरू आहे.
पुणे : शहरातील सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाजवळील मुख्य चौकातील औंधकडे जाणारा व रेंज हिल्स या दोन्ही पुलाचे रॅम्प काढण्याचे काम सुरू असल्याने आठ आॅगस्टपर्यंत वाहतुकीत थोडा बदल करण्यात आला आहे.
या भागात प्रवास करणाऱ्यांनी नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे झालेला बदल लक्षात घेऊन प्रवास करावा व वाहतूक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन चतु:श्रुंगी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे यांनी केले आहे.
वाहतुकीत करण्यात आलेला बदल पुढीलप्रमाणे:
औंधच्या दिशेने शिवाजीनगरकडे येणारी वाहतूक चतु:शृंगी पोलीस ठाण्यासमोरून विद्यापीठाच्या मिलेनियम गेटमधून उजवीकडे वळून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येऊन डावीकडून सरळ नेहमीच्या रस्त्याने शिवाजीनगरकडे वळवण्यात आली आहे.
रेंजहिल पुलावरून जाणारी वाहतूक पुलाच्या उजवीकडून श्री सेवा इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या समोरून वळवून पुढे कृषी बँक महाविद्यालयासमोरून दुभाजक तोडून पुन्हा नेहमीच्या सरळ रस्त्याने शिवाजीनगरच्या दिशेने जाता येईल.
शिवाजीनगरकडून विद्यापीठकडे जाणारी वाहतूक सेंट्रल मॉल, संगण्णा धोत्रे पथ, ओम सुपर मार्केट, हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरीएट जंक्शन, सेनापती बापट रस्त्याने सरळ विद्यापीठ चौकातून पुढे पाषाण मार्गे पाषाण व बाणेरची वाहतूक बदलण्यात आली आहे. तर औंधकडे जाणारी वाहतूक ही या अगोदर औंधकडून
शिवाजीनगरकडे येणाऱ्या मार्गावरुन पुढे औंधकडे वळवण्यात आली आहे.