पुणे :परीक्षा परिषदेतील टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहाराचा (TET Exam scam) तपास पुणे पोलीस योग्य पध्दतीने तपासणी करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे (CBI) द्यावी, अशी मागणी केली जात असली तरी सध्या त्याची आवश्यकता नाही. गैरव्यवहार कोणाच्याही काळात झालेला असो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणा-या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन समारंभानंतर अजित पवार पत्रकर परिषदेत बोलत होते. पवार म्हणाले, परीक्षा परिषद गैरवहार प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलिकडील आहे. शासनातर्फे या प्रकरणाचा खोलवर तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajput suicide case) याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सीबीआयने केलेला तपास सुरूवातील भरकटला होता. त्यानंतर शेवटी आत्महत्या केल्याचेच निष्पन्न झाले होते. हे विसरता येणार नाही.
पवार म्हणाले, केंद्र शासनाने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही गर्दी टाळण्याचे व कोरोना विषयक सर्व नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे. तसेच एस. टी. संपामुळे सर्व सामान्यांना त्रास होत आहे.कर्मचा-यांनी तुटेल एवढे ताणू नये.