जुन्नर : पुण्यातील सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आहोत, अशी स्वत:ची ओळख करून देऊन काटेडे गावात दोन शेजा-यांमध्ये झालेल्या भांडणाचा तपास करण्याकरिता आल्याचे सांगणा-या एका महिलेसह इतर दोघा तोतयांना ग्रामस्थांनी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी (दि. ६) काटेडे या गावात ही घटना घडली.या प्रकरणी रामदास लक्ष्मण देवकर यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कुलस्वामी महादेव पारवे (वय २५, रा. धालेवाडी), सुवर्णा अशोक कुमकर (रा. बेल्हे, ता. जुन्नर), सोपान त्र्यंबक चौधरी (वय ३६, रा. पारनेर) या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामदास दिवेकर यांची त्यांच्या शेजारी असलेल्या नातेवाइकाबरोबर भांडणे झाली होती. याबाबतीत जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बुधवारी हे तीन तोतये पोलीस अधिकारी दिवेकर यांच्या घरी मोटारीतून आले. या गाडीला पोलीस असा फलक लावण्यात आला होता. या तिघांनी आपण सीबीआयचे अधिकारी असून तुमच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आम्ही आलो असे सांगितले. या वेळी दिवेकर यांना या तिघांचा संशय आल्याने त्यांनी ओळखपत्राची मागणी केली. तसेच तुमच्या चारचाकीला पोलीस नावाची पाटी कशी अशी विचारणा केली. या वेळी त्यांनी उडवाउडवीची दिली. तसेच पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी ग्रामस्थांनी त्यांना रोखले. येणेरेचे पोलीस पाटील सत्यवान घोगरे यांनी ही माहिती जुन्नर पोलिसांना देऊन या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
सीबीआयचे अधिकारी भासविणाऱ्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 2:00 AM