पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन (anis) समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) हत्या प्रकरणी बुधवारी (CBI) सीबीआयच्या वकिलांनी ३२ साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर केली असून, पुढील सुनावणी येत्या २९ ऑक्टोबरला होणार आहे. साक्ष नोंदणी तसेच उलटतपासणीला सुरूवात होणार आहे. इन्क्वेस्ट पंचनामा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर पुण्यात आल्यानंतर घटनेच्या पूर्वी जेथे राहिले होते. त्या सदनिकेची झडती घेतली तेव्हा उपस्थित असलेला साक्षीदार यांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविली जाणार आहे.
विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात (court) या खटल्याची सुनावणी सुरू आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी तब्बल आठ वषार्नंतर आरोपी डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यानंतर सीबीआयच्या वतीने पुराव्यांच्या कागदपत्रांची यादी सादर करण्यात आली होती. मात्र आरोपीचे वकील सुवर्णा आव्हाड- वस्त यांनी कागदपत्रे अमान्य केली होती. बुधवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी ३२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली. तत्पूर्वी आरोपीचे वकिलांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे शवविच्छेदन सीडी, एक्सरे, आणि घटनास्थळावरील छायाचित्रे आणि मृतदेहाचे छायाचित्रे आदींची मागणी अर्जा्द्वारे केली. त्यावर न्यायालयाने सदर साहित्य ईमेल अथवा प्रत्यक्षात येत्या आठ दिवसांत आव्हाड यांना देण्यात यावे अशी सूचना सीबीआयच्या अधिका-यांना केली.
अंदुरे आणि कळसकरला येरवडा कारागृहात हलविले
औरंगाबाद येथील कारागृहात असलेला आरोपी सचिन अंदुरे आणि आर्थर रोड कारागृहात असलेला शरद कळसकर या दोघांना येरवडा कारागृहात हलविण्यात आले आहे. बुधवारी आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदूरे आणि शरद कळसकर या तिघांनी येरवडा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयातहजेरी लावली. तर आरोपी विक्रम भावे प्रत्यक्ष न्यायालयात हजर होता. मात्र, यापुढील सुनावणीला आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.
आरोपींशी संवाद साधण्याची वकिलांची मागणी न्यायालयाने फेटाळली
आरोपींशी संवाद साधायचा आहे थोडा अवधी द्यावा अशी मागणी वकील सुवर्णा आव्हाड यांनी केली. मात्र, ती न्यायाधीशांनी फेटाळून लावली. आपणास दीड महिन्याचा कालावधी दिलेला आहे असे सांगत आता आणखी तारीख वाढवून मागू नका. आपण आरोपींना न्यायालयात आल्यानंतर भेटा, त्यांच्याशी बोला अथवा कारागृहात जाऊन कधीही बोलू शकता असे सांगितले. तसेच आपल्याला साक्षीदारांची यादी दिली आहे त्यावर पुढील तारखेपासून सुनावणी होणार असल्याचेही सांगितले. सुनावणीदरम्यान, आरोपींचे वकील, दोन्ही बाजूंच्या दोन ते तीन व्यक्ती आणि केवळ 5 माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये कडेकोट सुरक्षा ठेवत पुढील सुनावणी आणि साक्ष नोंदविली जाणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक शनिवारी होणार सुनावणी
पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर मध्ये प्रत्येक शनिवारी १३ , २० आणि २७ रोजी सुनावणी होणार तसेच डिसेंबर महिन्यातील ४, ११, १८ आणि १९ तारखेला सुनावणी होणार आहे. या दरम्यान साक्ष नोंदणी आणि आरोपीच्या वकीलाकडून उलटतपासणी होणार आहे. तसेच सुनावणीच्या दिवशी केवळ डॉ. दाभोलकर खटल्यावरच कामकाज चालणार असेही न्यायाधीशांनी सांगितले.