पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने दि मुस्लिम को आॅप बँकेच्या भवानी पेठेतील मुख्य कार्यालयासह त्यांच्या राज्यातील १७ शाखांवर तसेच एकूण ३२ ठिकाणांवर गुरुवारी एकाचवेळी छापे घालण्यात आले. याशिवाय बँकेच्या अधिका-यांच्या पुणे, लोणावळा आणि बारामती येथील निवासस्थानांवरही छापे घालण्यात आले आहेत. यावेळी महत्वाची कागदपत्रे सीबीआयने ताब्यात घेतली असून चौकशी सुरु असल्याची माहिती सीबीआयने दिली नोटाबंदी काळातील बँकांची तपासणी, राजकीय डावपेच, असंतुष्टांच्या तक्रारी हे या छाप्यामागील कारण असू शकते, असे मुस्लीम बँकेचे अध्यक्ष डॉ़ पी़ ए़ इनामदार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
याप्रकरणी सीबीआयने १२० ब, ४२०, ४७१, ४७७, ए तसेच कलम १३ (२) अन्वये बँकेच्या ९ अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याच्या तपासासाठी हे छापे घालण्यात आले आहेत.
नोटा बंदी जाहीर झाल्यानंतर मुस्लिम को आॅप बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संगनमत करुन सुमारे ४० लाख रुपयांच्या १०० रुपये व ५० रुपयांच्या नोटा बदलून त्याजागी बंद केलेल्या १ हजार व ५०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात आला. त्यासाठी त्यांनी मुख्य शाखा आणि बँकेच्या अन्य शाखांमधील कॅश बुक बदलून त्यात खोट्या नोंदी केल्या आणि १ हजार व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा बदलल्या़ बँकिंगच्या नियम आणि मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले आहे.
नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर मुस्लिम को़ आॅप बँकेचे अध्यक्ष पी़ए़ इनामद यांनी मनी लाँडरिंग करत बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याची तक्रार असिफ खान यांनी केली होती़ त्याची दखल घेत सीबीआय पथक गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बँकेच्या भवानी पेठेतील मुख्य कार्यालयात पोहचले. त्यांनी कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरु केली.सायंकाळपर्यंत ही तपासणी सुरु होती. सीबीआयच्या अधिका-यांच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे लागली असून ती त्यांनी ताब्यात घेतली आहे.
मुस्लिम को़ आॅप बॅकेंचे लेखापरिक्षण करण्याचे आदेश सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेने दिले आहेत. विशेष लेखा परिक्षक बी. एच. बोडखे यांच्याकडे या लेखापरिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बँकेचे संचालक एस. एम. इक्बाल, इम्तियाज लतीफ शिकीलकर यांनी आपण अशी चौकशी व्हावी, अशी मागणी केल्यानंतर ही चौकशी होत असल्याचे सांगितले.
याबाबत मुस्लिम को आॅप बँकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी एका पत्रक प्रसिद्धीला दिले असून त्यात त्यांनी सांगितले की, मुस्लिम को आॅप बँकेत गुरुवारी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या अधिका-यांनी येऊन बँकेच्या एका दोन नोंद वह्यांच्या प्रती घेतल्या. या पूर्वीही सीबीआय अधिकारी बँकेत येऊन गेलेले आहेत मात्र, त्यांनी कोणत्या कारणासाठी बँकेला भेट दिली हे सांगितलेले नाही.
बँकेच्याच दोन संचालकांनी बॅँक व माझ्याविरुद्ध तक्रारी केल्याचा किंवा सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीच्या कर्ज प्रकरणाला ज्यांनी विरोध केला. त्यांच्याच राजकीय डावपेचाचा हा भाग असण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या काळात अनेक सहकारी बँकांच्या नोंदी तपासल्या जात आहेत. त्या तपासणीचाही हा भाग असून शकतो, असे या पत्रकात म्हटले आहे.