पुणे : शहरातील बांधकाम व्यावसायिक ‘सीबीआय’च्या रडारवर आले असून, एका बांधकाम व्यावसायिकावर कारवाईदेखील केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाची ९१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी के. जे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर आणि तिचे संचालक कल्याण जाधव यांच्यासह विनोद कल्याण जाधव यांच्यावर कारवाई केली. यामुळे बांधकाम व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. दोन दिवसात दोघांवर केंद्रीय तपास संस्थांकडून कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकार?
युनियन बँक ऑफ इंडियाने सीबीआयकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने कारवाई सुरू केली. के. जे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने त्यांच्या स्टॉक बुक, कर्ज विवरणाची खोटी आकडेवारी सादर केली. तसेच नफा अन् तोट्यासंदर्भात चुकीची आकडेवारी दिली. या माहितीच्या आधारे कंपनीने क्रेडिट सुविधांचा लाभ घेत ९१ कोटींची फसवणूक केली.
कोणावर झाली कारवाई...
युनियन बँक ऑफ इंडियाने तक्रार दिल्यानंतर के. जे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कल्याण जाधव, कल्याण एकनाथ काकडे, संतोष संभाजी धूमल आणि अमोल मारूती पायगुडे, कंपनीची आणखी एक शाखा विंग इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि विनोद कल्याण जाधव यांच्यावर ‘सीबीआय’ने कारवाई केली आहे.
हार्ड डिस्क जप्त
सीबीआयने लावलेल्या आरोपानुसार, आरोपींनी हा पैसा सरळ खात्यात हस्तांतरित केला. त्यामुळे बँकेचे ९१.९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात सीबीआयने पुणे आणि जवळपासच्या ठिकाणी छापेमारी केली. त्यात हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त केले आहे. या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.