लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्यार्थी सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा आणि स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या महत्त्वाच्या निर्णयाची यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबाजवणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्हीसाठी आवश्यक नियमावलीच अजून तयार नसल्याने सीसीटीव्ही बसविता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्कूलबससह शाळांमध्ये देखील सीसीटीव्ही बसवावा अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने फेब्रुवारी २०१७मध्ये दिल्या होत्या. या शिवाय तक्रारपेटी ठेवण्याचे आदेशही देण्यात आले होते. राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक व प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषदेने संबंधित शाळा आणि स्कूलबस चालकांना तशा सूचना देणारे पत्र तत्कालिन शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे यांनी काढले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी म्हणाले, शाळा आणि स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यामागील उद्देश अतिशय चांगला आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या नियमावलीचा अंतर्भाव अजूनही स्कूलबस नियमावलीत झालेला नाही. तसेच सीसीटीव्हीचे निकष नक्की काय असतील हेदेखील ठरलेले नाही. मोठी बस असेल तर एकाहून अधिक सीसीटीव्ही बसवावे लागतील. मग, ते नक्की कोठे बसवायचे, लहान बस आणि व्हॅनमध्ये ते कोठे आणि किती असतील हेदेखील ठरवावे लागेल. या सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग किती दिवस जपून ठेवायचे याचे निकष निश्चित करावे लागतील. हा निर्णय राज्यासाठी असल्याने त्याबाबतची नियमावली स्पष्ट झाली पाहिजे. त्यातील सर्व बारकाव्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने त्यासाठी पाठपुरावा करायला हवा. परिवहन आणि शिक्षण विभागाची उच्चस्तरीय बैठक होणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला असल्याचे आजरी म्हणाले.
‘सीसीटीव्ही’लाच नाही नियमांचे कवच
By admin | Published: June 24, 2017 6:11 AM