बारामती - तालुक्यातील यात्रांवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. गावोगावच्या यात्रा शांततेत सुरळीत पार पडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नारोळी गावात सीसीटीव्ही बसविल्याने यात्रा तुलनेने अधिक शांततेत पार पडली. यात्रेसह इतर सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्हीचा पर्याय प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता यात्रा कमिटी, गावकारभारी, पोलीस पाटील यांना त्यासाठी आवाहन करीत आहे.तालुक्यातील वडगाव निंबाळकर ठाण्याच्या हद्दीतील नारोळी गावाची नुकतीच पार पडलेली यात्रा शांततेत झाली. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात यात्रा कमिटीची मीटिंग घेतली. त्यांना योग्य त्या सूचना केल्या. सूचना करीत असताना पारंपरिक व धार्मिक कार्यक्रम जसे छबिना, पालखी तुमच्या वेळेनुसार चालले तरी चालेल; पण तमाशा, आॅर्केस्ट्रा यासारखे कार्यक्रम ध्वनिप्रदूषण नियमाप्रमाणे रात्री १० वाजता बंद करण्याची सक्त सूचना करण्यात आली. त्या वेळी लोकांनी उशिरा कार्यक्रम सुरू ठेवण्याबाबत आग्रह धरला. यावर पोलीस प्रशासनाने संवाद साधून सांगितले, की पोलीस ठाण्याने त्यांना यात्रेच्या वेळी गावागावांतून यात्रेसाठी लोक येत असतात. काही स्थानिक लोक नोकरीनिमित्त बाहेर असतात; पण यात्रेसाठी गावी येतात. त्या वेळी जुनी भांडणे, बांधाची भांडणे निघण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये यात्रेमुळे दारू पिऊन येणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे आपली धार्मिक यात्रेमधील शांतता धोक्यात येण्याची शक्यता अधिक असते. तसेच, आपल्या श्रद्धेला तडा जातो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असे आवाहन करण्यात आले. तसेच, तसेच आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या गावासाठी यात्रा खर्चात कपात करून गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावतेत, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या सूचनेनुसार नारोळी ग्रामस्थांनी गावात २ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. शिवाय, तमाशा रात्री १०.३० वाजता बंद केला. सीसीटीव्ही कॅमेºयामुळे येणाºया लोकांवर दबाव राहिला. सार्वजनिक कार्यक्रम वेळेत संपल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यात्रा शांततेत पार पडली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर गावांच्या यात्रेतही वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामार्फत अशाच स्वरूपाची भूमिका घेण्यात येईल. आपली यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी इतर गावांनीही सहकार्य करावे. तालुक्यात पोलीस प्रशासन सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले, की गावागावांमध्ये होणाºया बैठकीत सीसीटीव्ही बसविण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. पोलीस पाटील, गावकारभाºयांनादेखील त्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळी, गुणवडी, डोर्लेवाडी, मळद या गांवामध्ये २२ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तर, तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत १० गावांमध्ये १२३ ठिकाणी, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत २९ गांवांमध्ये १३६ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यात्राकाळात गावावर सीसीटीव्हीची नजर राहणार असल्याचेदेखील शिरगावकर यांनी सांगितले.
यात्रांवर आता सीसीटीव्हीची नजर, बारामती तालुक्यातील पोलीस प्रशासनाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 12:42 AM