पुणेः शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळचं लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी झाले आहेत. होर्डिंग कटिंगचं काम सुरू असताना तो अख्खा सांगाडा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळला आणि सगळेच हादरले. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पाहताना अंगावर काटा येतो. ४०x२० फुटाचं हे होर्डिंग काढताना त्याच्या मागचा आधारच काढून घेतल्यानं हा धक्कादायक प्रकार घडला.
पाहा व्हिडीओः
या अपघातात देहूरोडमधील शामराव धोत्रे (48), पिंपळे गुरवमधील भीमराव कासार (70), नाना पेठेतील शिवाजी परदेशी (40), जावेद मिसबाउद्देन खान (49) यांचा मृत्यू झाला आहे. तर उमेश धर्मराज मोरे (36), किरण ठोसर (45), यशवंत खोबरे (45), महेश वसंतराव विश्वेशवर (50), रुख्मिनी परदेशी (55) हे गंभीररीत्या जखमी आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. समर्थ परदेशी (4), समृद्धी परदेशी (18) यांना किरकोळ दुखापत झाल्यानं त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.
हे होर्डिंग रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे असल्याची माहिती समोर येत आहे. हे होर्डिंग काढण्यासाठी महापालिकेने रेल्वेशी 2013 पासून वारंवार पत्रव्यवहार केला होता, पण कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप महापालिकेने केला आहे.