पुण्यात १९ फेब्रुवारी रोजी मारणे टोळीतील काही सराईतांनी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केली. मारहाण झालेला तरुण केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले. या मारहाण प्रकरणाची पुणेपोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी गजानन मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोडिंबा पडवळ, अमोल तापकीर या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात गजानन मारणे याला पोलिसांनी अटक केली आहे. मारणे स्वत: या मारहाणीवेळी घटनास्थळी उपस्थित होता असा दावा करण्यात आला आहे. मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत, यात गजा मारणे मारहाणीबाबत सूचना देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अभियंता तरुणाला मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणात पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. कोथरूड पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गजा मारणे हा हजर झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी त्याला रात्री अटक केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले.
गुन्ह्याच्या घटनास्थळाचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून इतर साथीदार कोण होते, त्यांची नावे निष्पन्न करून सखोल तपास करायचा असल्याने १४ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी केली.
'याला माज आलाय, याला मारा'
या प्रकरणी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. हे फुटेज मारहाण ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. वेळी या फुटेजमध्ये मारहाण होत असताना गजा मारणे हा काही अंतरावरच उभा होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली. त्याचबरोबर याला माज आलाय, याला मारा अशा सूचना देखील गजा मारणे देत होता अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यासंदर्भात पुरावे देण्यात आले आहेत.