लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्यातील ९६ पैकी ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लवकरच ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.जिल्ह्यातील अपंगांना प्रमाणपत्र घेण्यासाठी पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये यावे लागते. एका भेटीत हे प्रमाणपत्र मिळत नाही. आठवड्यातून एकाच दिवशी प्रमाणपत्र मिळण्याची सोय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या अपंगांना वारंवार हेलपाटे मारायला लागू नये, याकरिता ससून हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील अपंगांसाठी समन्वयक नियुक्त करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे.एका प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यासाठी ६६ हजार ५०० रुपये खर्च अपेक्षित आहे. ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याकरिता ४९ लाख १२ हजार रुपयांचा खर्च येतो. परंतु, जिल्हा परिषदेला २५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याने ९६ पैकी ४० आरोग्य केंद्रांमध्येच सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन आहे. ज्या आरोग्य केंद्रांना ‘एनएबीएच’चे प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा केंद्रांमध्ये प्राधान्याने सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.
आरोग्य केंद्रात ‘सीसीटीव्ही’ची करडी नजर
By admin | Published: June 10, 2017 1:55 AM