पुणे : शिक्षण क्षेत्रातील नामांकित पुणे विद्यार्थी गृह संस्थेचा ११२ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे शासकीय नियमांचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम-लक्ष्मण आणि कुलगुरू कै. दादासाहेब केतकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
दरवर्षी संस्थेचे हितचिंतक, देणगीदार, माजी विद्यार्थी व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वर्धापनदिन साजरा होतो. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे वेदघोष, स्वागत समारंभ व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक सर्वश्री कृष्णाजी कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, रमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. वर्धापनदिनाच्या निमित्ताने देणगीदार, माजी विद्यार्थी आदींनी शुभेच्छा संदेश पाठवले. तसेच अनेकांनी ऑनलाइन देणगी संस्थेच्या खात्यावर जमा केली. त्याबद्दल संस्थेने सर्वांचे आभार मानले.