लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोणत्याही राजकीय नेत्याचा नव्हे तर माझा वाढदिवस लावणी कलाकारांनी केक कापून कार्यक्रमातच तो साजरा केल्याचे स्पष्टीकरण निर्माते शशिकांत कोठावळे यांनी दिले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिल्याने गैरसमजूतीमधून हा प्रकार घडला. मात्र, असे प्रकार घडणे अत्यंत चुकीचे आहे. आधीच कलाकारांच्या हाताला काम नाही, त्यातून असे कार्यक्रम बंद पाडले तर कलाकारांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सर्व राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला होता. तरीही बालगंधर्व रंगमंदिरात (दि.१) लावणीचा कार्यक्रम रंगला. एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप मनसेचे कसबा अध्यक्ष गणेश भोकरे यांनी केला. राजकारण्यांनी कार्यक्रम घेऊ नयेत आणि त्याला हजेरी लावू नये, असे आदेश असताना बालगंधर्व रंगमंदिरात तमाशा रंगला. परंतु, मनसेने हा कार्यक्रम बंद पाडला. त्याविषयी स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनेश भोसले म्हणाले, प्रत्येक पक्षाचा एक सेल असतो. त्यामाध्यमातून कलाकारांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला जातो. मनसेच्या कार्यकर्त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली. ती कुणी दिली त्याचा आम्ही शोध घेत आहोत. ज्याने चुकीची माहिती दिली त्याने समोर यावे. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. निर्माते शशिकांत कोठावळे यांनीही त्याला दुजोरा दिला. वर्षभर कलाकारांना आम्ही किट दिले. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून कलाकारांनी हा वाढदिवस केला. आमचे म्हणणे आहे नाट्यगृहात कार्यक्रम सुरू राहायला हवेत.
---
सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यासंबंधी शासनाने नवीन नियमावली जाहीर केली. परंतु, त्यापूर्वी जानेवरीमध्येच नाट्यगृहांच्या चारमाही तारखांचे वाटप झाले होते. त्यानुसार हा कार्यक्रम झाला. नवीन नियमावलीप्रमाणे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
- सुनील मते, व्यवस्थापक बालगंधर्व रंगमंदिर