पुणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी ख्रिस्तधर्मियांनी नाताळ साजरा करावा पण तो साधेपणानेच करावा, असे आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत़ चर्चमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीतच विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहे.
कोरोना आपत्तीमुळे यावर्षी नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये गर्दी होणार नाही व शारीरिक अंतराचे पालन होईल, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे महापालिकेने सूचित केले आहे़
नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये येशूंच्या जीवनावरील देखावे, ‘ख्रिसमस ट्री’ यांचे आयोजन केले जाते. यासाठीही स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्यासाठी उपाययोजना करणे, प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा समावेश करणे, यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून शारीरिक अंतर राखणे याचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने व स्टॉल लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
चौकट
“सुरक्षिततेच्या कारणास्तव ६० वर्षांवरील नागरिक आणि १० वर्षाखालील बालकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. घरामध्येच नाताळ साजरा करावा. चर्चनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करून द्यावी़ सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये. मिरवणूक काढू नये, फटाक्यांची आतिषबाजी करु नये,” असे महापालिकेने स्पष्ट केले आहे़