उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर
मंदार जवळे
ओतूर : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून यावर्षीचाही गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे या करिता बुधवारी रोजी ओतूर पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे हे बोलत होते. शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांसह गावोगावचे पोलीस पाटील, पोलीस मित्र, ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी काही मार्गदर्शक सूचनादेखील दिल्या. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी घेणे क्रमप्राप्त असून मंडप घालण्यावर व गणेशमूर्तींच्या उंचीबाबत सार्वजनिक मंडळास ४ फूट तर घरगुती गणपतीकरिता २ फुटांची मर्यादा घालण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी मंडळांनी आरोग्याविषयी उपक्रम राबवावेत उदा.-रक्तदान, कोरोना, मलेरिया, डेंग्यू हे आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन या धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घेऊन ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन व्हावे, गणेश मंडपात निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशा प्रकारच्या सूचना यावेळी उपस्थितांना देण्यात आल्या.
ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ६० छोट्या मोठ्या गावात दीडशेवर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे असून या सर्व मंडळांना पोलीस विभागाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांनी आभार मानले.