सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात ‘सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अॅण्ड कम्युनिकेशन’ तर्फे छोट्या विमानांचे प्रात्यक्षित (एरोमॉडेलिंग शो) केले. कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, एअर मार्शल भूषण गोखले, सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकेशनचे समन्वयक प्रा. डी. जी. कान्हेरे उपस्थित होते.
भूषण गोखले म्हणाले, सध्या प्रत्यक्ष युद्धभूमीवर अनेक रोबोटिक्सची गरज भासते. हवेबरोबर पाणी व खाणीमध्येही अशा मानवविरहित यंत्रांची गरज भासते. त्यामुळेच असे ‘शो’ युवा पिढीला प्रोत्साहन देण्याचे काम करतात.
प्रा. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, आज ड्रोनचा वापर अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या कामांसाठी होतो. त्याचप्रमाणे ही विमानेही भविष्यात उपयोगी असणार आहेत. त्यामुळेच याकडे केवळ खेळ म्हणून न पाहता याचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग होईल याबाबत आपण विचार करायला हवा.
यावेळी विद्यार्थी अथर्व काळे याने तयार केलेल्या सुमारे १५ छोटेखानी विमानांचे प्रात्यक्षिक सादर केले.