शनिवारवाड्याचा २८९ वा वर्धापनदिन : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनेक पराक्रमी वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शनिवारवाडा...स्वाभिमान जागृत करणारा शनिवारवाडा...दिल्लीच्या तख्ताला दहशत घालणारा शनिवारवाडा... शनिवारवाड्याच्या दगड्याच्या चिऱ्याचिऱ्यात मराठा सत्तेच्या पराक्रमाचा इतिहास आहे... अशा ऐतिहासिक शनिवारवाड्याचा भव्य दिल्ली दरवाजा शुक्रवारी (दि. २२) पूर्ण उघडण्यात आला. रांगोळीच्या पायघड्या घातलेला आणि हार-तोरणांनी सजविलेल्या, पुण्याचे वैभव असलेल्या शनिवारवाड्याचा २८९वा वर्धापन दिन पुणेकरांच्या उपस्थितीत साजरा झाला.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या २८९व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार वाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांनी शनिवारवाड्याच्या आणि पेशव्यांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली. माजी आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे आणि कुटुंबीय, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर चिफ मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, मुकुंद काळे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, ब्राह्मण महासंघाचे मकरंद माणकीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.
मोहन शेटे म्हणाले, “जागेचे भूमिपूजन १७३० मध्ये झाले होते. त्यानंतर, २२ जानेवारी, १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत झाली, परंतु हा वाडा कधीच शांत नव्हता, पराक्रमाचा सूर्य कधीच शांत नसतो. शनिवारवाड्यासारख्या भव्य वास्तू महाराष्ट्रात, भारतात अनेक असतील, परंतु या वास्तुसमोर जो पराक्रम घडला आहे, त्या पराक्रमाची तुलना अन्य वास्तुंशी करता येणार नाही. सतत ८० वर्षे भारतावर प्रभुत्व निर्माण करण्याचे काम या वाड्याने केले होते.”