लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ. ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे. आत्मविश्वासाच्या पंखांवर कर्तव्याचे ओझे सांभाळत ती मुक्तपणे झेप घेऊ लागली आहे. या व्यासपीठावरून फक्त शहरच नाही तर ग्रामीण भागातील महिलाही गगनभरारी घेऊ लागल्या आहेत. त्यांच्या कलेला, प्रतिभेला वाव देण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हास्तरीय सखी महोत्सव २०१७ चे आयोजन करण्यात आले. लोकमत सखी मंच आयोजित पॉवर्ड बाय बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मध्ये विविध स्पर्धांनी नटलेला उत्सव; ज्यात एकल नृत्य, एकपात्री अभिनय, रांगोळी, गीतगायन, मेंदी स्पर्धा, काव्यवाचन आणि समूह नृत्य अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी स्पर्धकांचे परीक्षण करण्यासाठी अनमोल कला मेंदीचे सर्वेसर्वा अनमोल कला यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमातून सखींच्या कलाविष्काराची मुक्त उधळण बघायला मिळाली. प्रत्येक स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. याचबरोबर स्त्रियांचे आर्थिक नियोजनदेखील व्यवस्थितरीत्या व्हावे, यासाठी खासकरून महिलांसाठी बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्या वतीने ‘स्वाभिमान’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा, यासंदर्भात बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सचे प्रतिनिधी पराग देथेकर यांनी मौलिक मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या सखी महोत्सवात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
सखींच्या सहभागाने रंगला सखी महोत्सव
By admin | Published: May 06, 2017 2:37 AM