पुणे : पुण्यातील अत्यंत वर्दीळीचा, सातत्त्याने माणसांच्या गर्दीने गजबजून गेलेला, वाहनांच्या कोंडीमुळे गुदमरलेला लक्ष्मी रोड आज चक्क मोकळा श्वास घेत होता. रस्त्याला केलेली रंगरंगोटी, खेळण्यात मग्न झालेली लहान मुले अन त्यांचे पालक अशा वातावरणात पादचारी दिन साजरा झाला. खेळासह वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला होता.
पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या पादचारी दिनाच्या निमित्ताने हे चित्र पहावयास मिळाले. शहरातील वाहतूक पादचारी पूरक व्हावी यादृष्टीने पुणे महापालिका गेल्या दोन वर्षापासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यंदाचे हे तिसरे वर्ष होते.
उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक या दरम्यान पादचारी दिन साजरा करण्यात आल्याने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद आज सकाळपासून ठेवण्यात आली होती. ‘वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजनांचा संदेश देणारा सापशीडाचा खेळा आयोजित करण्यात आला. सापशिडी खेळता खेळता लहान मुलांमध्ये जनजागृती करण्यात आली. सेफ किड्स फाउंडेशनतर्फे वाहतूक नियमांची माहिती मुलांना देण्यात आली, तसेच वाहतुकीचे नियम पाळणार असल्याची प्रतिज्ञा करण्यात आली.
अनेक मुलांनी रस्त्यावर चित्र काढण्याचा आनंदही घेतला. रस्त्यावर जागोजागी कुंड्या ठेवून आणि रंगी बेरंगी तोरण बांधून सजावट करण्यात आली होती. याशिवाय अन्यवेळी रस्त्यावरून जाताना लहान मुलांना कडेवर उचलून घेणारे किंवा बोट धरणारे पालक काळजी न करता मुलांना मोकळे सोडत होते. मुलेही पालकांचा आधार न घेता आनंदात बागडत होते.