पुणे : ना डीजे, ना लेसरचा वापर असा निर्धार करत आणि अचकट विचकट गाण्यांना पहिल्या दिवसापासूनच मनाई करत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाचा सन्मान अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागाने केला आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देत गौरव केला.
गणेशोत्सवात डीजे आणि लेसरचा वापर करायचा नाही असा निर्धार करत तो यंदा अमलात आणला. मंडळाचे अध्यक्ष रोहन शिंदे, उपाध्यक्ष हरी मेमाणे तसेच मनोज शेलार, गौरव मळेकर, संग्राम साळुंखे, अथर्व इंदलकर व अन्य कार्यकर्त्यांना नागरिकांनी दाद दिली. फक्त इतकेच नाही तर भारतीय पारंपरिक पद्धतीप्रमाणेच सर्व सांस्कृतिक व धार्मिक गोष्टींप्रमाणेच त्यांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. उत्सवात डीजे, लेसर बंद करा या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करणारे अ. भा. ग्राहक पंचायतीचे राज्य अध्यक्ष विलास लेले व त्यांच्या सहकाऱ्यांनीही या कार्यकर्त्यांची पाठ थोपटण्याचा निर्णय घेतला.
लेले यांच्यासह पुणे विभाग अध्यक्ष विजय सागर, रवींद्र वाटवे, प्रकाश राजगुरू, सुनील नाईक, अंजली देशमुख, वीणा दीक्षित, राजश्री दीक्षित, विजया वाघ, अंजली करंबळेकर, अंजली फडणीस, सई बेहरे, माधुरी गानू हे सर्व कार्यकर्ते बुधवारी सायंकाळी गुरुवार पेठेत थेट मंडळात पोहोचले. तिथे त्यांनी मंडपातच मंडळाच्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला. शहरातील अन्य मंडळांनीही याचा आदर्श घ्यावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.