लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरातील तिन्ही लोकीचे शिवलिंग मध्यरात्रीनंतर अडीच वाजता उघडण्यात आले. प्रशासनाने दिलेले आदेश व सूचनेनुसार मोजके पुजारी, मानकरी व सेवेकरी यांच्या हस्ते तिन्ही शिवलिंगाची पूजा-अभिषेक करण्यात आले. शेकडो वर्षांची परंपरा यंदा खंडित होऊन प्रथमच भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याची वेळ आली. तसेच जमावबंदी आदेश असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट होता.
जेजुरीतील महाशिवरात्री उत्सवाला विशेष महत्व आहे. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री मुख्य मंदिर कळसातील व भूगर्भातील शिवलिंग उघडले जाते. मानकरी, सेवेकरी, पुजारी यांच्या हस्ते पूजा-अभिषेक करण्यात आल्यानंतर भाविकांना दोन दिवस दर्शनासाठी खुले होते. त्यानंतर पुन्हा पूजन करण्यात येऊन दोन्ही शिवलिंग बंद केली जातात. मुख्य मंदिराच्या कळसातील शिवलिंग स्वर्गलोकीचे तर भूगर्भातील शिवलिंग पाताळलोकीचे समजले जाते. मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकीचे समजले जाते. तिन्ही शिवलिंगाचे म्हणजेच त्रैलोकीचे दर्शन फक्त महाशिवरात्रीला होत असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते.
मात्र, या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने राज्यातील सर्व जत्रा यात्रा उत्सव रद्द केल्याने जेजुरीचे मंदिर ही भाविकांना देवदर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री तिन्ही शिवलिंगाचे पूजन होऊन दोन कळसातील व भूगर्भातील शिवलिंग मंदिर बंद करण्यात येणार आहे. शनिवार(दि.१३)पासून भाविकांना गडकोट मुखदर्शनासाठी खुला होणार आहे.
यंदा मोजक्या पुजारी, मानकरी, सेवेकरी यांच्यावतीने पूजा, अभिषेक व सालाबादप्रमाणे परंपरेनुसार धार्मिक विधी करण्यात आले.
यावेळी मुख्य आठवडेकरी पुजारी महेश बारभाई शुभम सातभाई, अजिंक्य बारभाई, निलेश मोरे, प्रमोद मोरे, जालिंदर खोमणे, सोमनाथ उबाळे, मानकरी राजेंद्र सोनवणे, आनंद सोनवणे, प्रसाद वासकर, आशिष वासकर, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, सुधाकर मोरे, गणेश आगलावे, चेतन सातभाई, माऊली खोमणे, सचिन दोडके, प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे, विश्वस्त तुषार सहाणे, संदीप जगताप आणि मानकरी सेवेकरी उपस्थित होते. यावर्षी भाविक गडकोट आवारात नसल्याने मुख्य मंदिर आवार सुनेसुने वाटत होते.
फोटो : सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जयमल्हार या गजराशिवाय यंदाचा महाशिवरात्री उत्सव पार पडला.