तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक १००८ देविपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी साठ वर्षांपूर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केले आहे. तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महंत हेमंतपुरी महाराज यांनी महामस्तकाभिषेक करून श्रींची आरती केली. दुपारी बारा वाजता रामजन्म झाल्यानंतर हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते रामजन्मोत्सवाची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद देण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिलपासून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आजही भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही अशी पूर्व कल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यामुळे एकही भाविक मंदिरात आला नाही. दर वर्षी येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. दरवर्षी येथे साधारण पंचवीस ते तीस हजार भाविक दर्शनासाठी येतात. रस्ता दिवसभर दुचाकी, चारचाकींनी वाहत असतो. परंतु कोरोना पार्श्वभूमीवर सन २०२० व २०२१ ची रामनवमी मात्र खूपच शांततेत पार पडली. आज दुपारी शहर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तीर्थक्षेत्र रामदरा येथे भेट दिली.
भक्तांविना सुने असलेले तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिर.