शेलपिंपळगाव :पाहूनी समाधीचा सोहळा !दाटला इंद्रायणीचा गळा !!बाळ सिद्ध पाहता चिमुकला !कुणी गहिवरे कुणी हळहळे !भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळला !! चोखा गोरा आणि सावता !निवृत्ती हा उभा एकटा !सोपानासह उभी मुक्ता आश्रपूर लोटला !! ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’.... असा कीर्तनातील जयघोष... बारा वाजताचा घंटानाद... समाधीवर पुष्पवृष्टी... संत नामदेवमहाराज व माऊलींची भेट... आणि भाविकांचे पाणावलेले डोळे... अशा भावपूर्ण वातावरणात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा ७१९ वा संजीवन समाधी सोहळा बुधवारी (दि. ९) पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी ‘श्रीं’चे डोळे भरून दर्शन घेतले.पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पूजा घेण्यात आली. सकाळी अकरापर्यंत भाविकांच्या महापूजा, दर्शन व नामदेवराय यांच्या वतीने श्रींची पहापूजा घेण्यात आली. सकाळी विनामंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सकाळी दहाला संत नामदेवमहाराजांचे १६ वे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वरमहाराज नामदास यांचे कीर्तन सुरू झाले. मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक आणि माऊलींच्या समाधीवर विविध फुलांची पुष्पवृष्टी करून आरती घेण्यात आली. संत नामदेवमहाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत विनामंडपातून करंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माऊलींच्या समाधीपुढे विराजमान करण्यात आल्या. महानैवेद्य देऊन वंशज, चोपदार व मान्यवरांना नारळ-प्रसाद देण्यात आला. बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
पाहुनी समाधीचा सोहळा ! दाटला इंद्रायणीचा गळा !!
By admin | Published: December 10, 2015 1:11 AM