मांजरी: मांजरी येथील मुळामुठा नदी पुलावरील सिमेंटचा थर पुराच्या पाण्याने वाहुन गेला. त्यामुळे वाहतुकीसाठी पुल खुला दिसला तरी पुलावरील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी आणखी तीन दिवस हा पुल वाहतुकीसाठी बंद असणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नानासाहेब परभणे यांनी सांगितले. नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली पुल वाहतुकीसाठी खुला दिसला. सकाळी वाहतुक चालू होती. परंतु, बांधकाम विभागाचे अधिकारी व हडपसर व लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आल्यानंतर या पुलावरील रस्त्याच्या कामासाठी वाहतूक बंद केली. नागरिकांनी हा रस्ता तात्पुरता डागडुजी करून वाहतुकीसाठी खुला ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु, त्यांनी वाहतुकीसाठी नकार दिला. सध्या सतत पाऊस पडत असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पुलावर पाणी आल्यास हा रस्ता राहणार नाही व खर्च वाया जाईल. त्यामुळे हा रस्ता पाऊस कमी झाल्यानंतर थोड्याच दिवसांत करा म्हणजे या पुलावर पाणी येऊन रस्ता खराब होणार नाही, असे हवेली तालुका काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष संजय उंद्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नानासाहेब परभणे यांना सांगितले. परंतु त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला दुजोरा न देता टेक्नीकल प्रॉब्लेम आहे ते तुम्हांला समजणार नाही असे उत्तर दिले. यावर संजय उंद्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, " जर हा रस्ता बनवून पूर आल्यावर पुन्हा वाहुन गेल्यास रस्त्याला झालेल्या खर्चाची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी परभणे यांच्या खिशातून भरावी अशी मागणी केली आहे.
पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल असे नागरिकांना वाटले. परंतु, सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तीन दिवस रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनचालकांची नाराजी झाली.