पुणे: पुणे महापालिकेच्या प्रकल्प व्यवस्थापन विभागाने एप्रिल २०१९ मध्ये पीपीपीअंतर्गत स्वारगेट ते सारसबाग यादरम्यान सिमेंट रस्ता तयार केला होता. पण, समान पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी हा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग आणि पथ विभागात समन्वय नसल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामाचे पैसेही अद्याप फिटलेले नसल्याने खोदाईमुळे या रस्त्याचा दोष दायित्व कालावधीही संपुष्टात आला. अगोदर सिमेंटचा रस्ता तयार करणे आणि नंतर जलवाहिनी टाकणे, असा पालिकेचा उफराटा कारभार सुरू आहे.
शहरात पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. पाइपलाइन तसेच अन्य सर्व्हिस लाइन्सच्या कामामुळे वारंवार होणारी खोदाई आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या रस्ते दुरुस्तीमुळे शहरातून वाहन चालविणे अवघड होत आहे. त्यामुळे शहराशी जोडणाऱ्या महामार्गासोबतच गर्दीच्या प्रमुख रस्त्यांवरील पाइपलाइन, इंटरनेट केबल, ड्रेनेज, पावसाळी गटारे, एमएनजीएल तसेच वीजवाहिन्यांची कामे येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. त्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती व रिसर्फेसिंगची १ मे ते १५ जूनपर्यंत कामे केली जाणार आहेत.
पालिकेकडून २०१७ मध्ये शहरात समान पाणी योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यावेळी ज्या ज्या भागात जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे, त्याचा नकाशा करून त्यानुसार आधी जलवाहिन्या टाकाव्यात. नंतर रस्ते करावेत, असा निर्णय झाला होता. मात्र, सुरुवातीपासूनच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या भागात महापालिकेचे स्वारगेट येथे पाणीपुरवठा केंद्र असतानाही जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. त्याच वेळी या ठिकाणी मेट्रोचेही काम सुरू झालेले होते. मात्र, त्यानंतर आता अचानक जागे झालेल्या पाणीपुरवठा विभागाकडून हा मुख्य वर्दळीचा रस्ता असतानाही कोणतेही पूर्वनियोजन न करता थेट रस्ता खोदाई सुरू केली आहे. प्रत्यक्षात ही खोदाई सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी माहिती फलक लावणे, बॅरिकेड्स करणे अशा कोणत्याही उपाययोजना न करताच थेट खोदाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जर ही जलवाहिनी महत्त्वाची होती आणि नंतर रस्ता खोदला जाणार आहे याची कल्पना हाेती, तरीही तो डांबरी न करता काँक्रीटचा का करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात ३० एप्रिलपर्यंत खोदाईस परवानगी आहे. हा रस्ता खोदण्यास अतिरिक्त आयुक्त स्तरावरून परवानी देण्यात आली आहे. समान पाणीपुरवठ्याच्या कामासाठी हा रस्ता खोदला जात आहे. -अनिरुद्ध पावसकर, विभागप्रमुख , पथ विभाग, पुणे महापालिका