पुणे : शहरातील सिमेंटच्या रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी शहरात राजरोसपणे वापरले जात असलेल्या प्रकाराची अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी गंभीर दखल घेतली आहे. शहरात सध्या काम सुरू असलेल्या सर्व सिमेंट रस्त्यांसाठी कोणते पाणी वापरले जाते याची संयुक्त पाहणी पथ विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश बकोरिया यांनी या दोन्ही विभागांना दिले आहेत. शहरात सुरू असलेल्या या रस्त्यांच्या तसेच इतर कामांसाठी अनधिकृतपणे नळजोड घेऊन लाखो लिटर पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचा प्रकार ‘सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी’ या वृत्ताद्वारे ‘लोकमत’ने उजेडात आणला होता. त्याची गंभीर दखल घेत बकोरिया यांनी हे आदेश दिले आहेत.दरवर्षी उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीमुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना, शहरात सुरू असलेल्या सिमेंटच्या रस्त्यांसाठी मात्र, बेकायदेशीर टॅप मारून राजरोसपणे पिण्याचे लाखो लिटर पाणी या रस्त्यांसाठी दिवसाढवळ्या वापरले जात आहे. विशेष बाब म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये हे प्रकार राजरोसपणे सुरू असून, सर्वसामान्यांना नळजोड द्यायला महिना महिना वेळ खाणारे महापालिका प्रशासन या ठेकेदारांच्या बेकायदेशीर नळजोडांकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे रस्ता तयार करताना, त्यासाठी लागणारे पाणी पिण्याचे असणार नाही याची जबाबदारी ठेकेदारवर देण्यात आलेली असते. मात्र, या ठेकेदारांकडून पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांना टॅप मारून अनधिकृत नळजोड घेतले आहेत. या रस्त्यांसाठी प्रत्येक १०० मीटरवर टॅप घेण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली होती.
सिमेंट रस्त्यांची चौकशी
By admin | Published: April 05, 2015 12:36 AM