पुणे : शहरातील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे कमी होत असल्यावरून नगरसेवकांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनावर टीकेची झोड उठवली. झोपडपट्टी विकसकाबरोबर संधान बांधून महापालिका प्रशासन नागरिकांचे हाल करीत असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील सभेत त्वरित सादर करावा, असा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिला.माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक धीरज घाटे यांनी या विषयाला वाचा फोडली. पुरेशा संख्येची सार्वजनिक स्वच्छतागृहे व शौचालये हे पुण्याचे वैशिष्ट्य होते. आता काही विशिष्ट नगरसेवक किंवा मोजकेच नागरिक व प्रामुख्याने झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम करणारा बांधकाम व्यावसायिक यांच्या हट्टाखातर अनेक स्वच्छतागृहे, शौचालये विनापरवाना पाडून टाकली जात असल्याची तक्रार घाटे यांनी केली. यासाठी त्यांनी त्यांच्या प्रभागातील काही उदाहरणेही दिली. अनिता कदम यांनी त्यांना दुजोरा देत बांधकाम व्यावसायिकाने सकाळी कोणीही नसताना येऊन सर्व सार्वजनिक शौचालये पाडून टाकली असल्याचे सांगितले.धनकवडे यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिक नागरिकांचे हाल करीत असल्याची टीका केली. प्रशासनाचा त्यांच्यावर काहीच वचक नाही. त्यांना हवे त्याप्रमाणे ते महापालिकेच्या मालकीची बांधकामे पाडून टाकतात. त्या भागातील नागरिकांना याचा त्रास होतो, तक्रार केली तरी महापालिकेचे अधिकारी त्याची दखल घेत नाही, असे सांगत त्यांनीही काही उदाहरणे दिली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनीही असाच आरोप करीत नागरिकांचे हाल करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे सांगितले.महापौर मुक्ता टिळक यांनी यावर आयुक्तांना खुलासा करण्यास सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांनी लवकरच याबाबतीत पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन धोरण ठरवण्यात येईल असे स्पष्ट केले. परवानगी न घेता सार्वजनिक शौचालये पाडणाºयांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
स्वच्छतागृहांवरून संतापले नगरसेवक, नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 7:36 AM