पुणे : देशाच्या अगामी जनगणना मोहीमेची रंगीत तालीम येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात निवडक जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात होणार आहे. यंदा प्रथमच जनगणनेची माहिती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्याचे राज्यस्तरीय प्रशिक्षण यशदा येथे नुकतेच संपन्न झाले. दर दहा वर्षांनी होणारी देशाची जनगणना २०२१ साली होत आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी देशाच्या महारजिट्रार तथा जनगणना आयुक्त कार्यालयाच्या वतीने देशभरात प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येत आहे. या मोहीमेची रंगीत तालीम देशभरातील निवडक जिल्ह्यात घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ३ ते ११ जून दरम्यान यशदा येथे घेण्यात आले. जनगणना आयुक्त विवेक जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला. तर, प्रशिक्षणाचे उद्घाटन राज्याच्या जनगणना संचालक रश्मी झगडे यांच्या हस्ते झाले. मे महिन्यात राष्ट्रीय पातळीवरील शिबीर नवी दिल्ली येथे झाले होते. यातील प्रशिक्षकांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि गोवा राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित केले. आता हे प्रशिक्षक पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षित करतील. या रंगीत तालमीतून जनगणनेची प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धती आणि माहिती संस्करणाची पद्धती सुनिश्चित करणे शक्य होणार आहे. या मोहिमेविषयी बोलताना जनगणना आयुक्त जोशी म्हणाले, जनगणना २०२१साठी रंगीत तालीम हा महत्त्वाचा टप्पा आहे. यंदा पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याची चाचणी दरम्यान केली जाईल. माहितीचे संकलन ऑनलाईन झाल्यास सरकारी धोरण ठरविण्यासाठी आणि संशोधकांना आवश्यक माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकते. ---------------
जनगणनेची रंगीत तालीम 'ऑगस्ट' मध्ये : यंदा प्रथमच होणार माहितीचे ऑनलाईन संकलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 12:46 PM
देशाच्या अगामी जनगणना मोहिमेची रंगीत तालीम येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात निवडक जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात होणार आहे.
ठळक मुद्देयंदा प्रथमच जनगणनेची माहिती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार