पुणे : राज्यात दररोज तीन ते साडेतीन लाख लसीकरण होत आहे. कारण त्याच प्रमाणात दररोज लसींचे डोस मिळत आहेत. चार-पाच दिवसांत एखाद्या वेळी आठ लाख डोस मिळतात. दररोज दहा लाख लसीकरणही करता येऊ शकेल. याबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार झाला आहे आणि गरज पडल्यास मी केंद्रीय मंत्री मांडविया यांना भेटायला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबद्दल बोललो आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ऑक्सिजन गळती सारख्या घडलेल्या दुर्दैवी घटना हे अपघात होते. राज्यात पुरेसा पुरवठा झाल्याने ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याच्या विधानाची त्यांनी पुनरावृत्ती केली.
पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, लस उत्पादक कंपन्यांनी २५ टक्के लसी खाजगी रुग्णालयांसाठी राखीव ठेवावेत, अशी नियमावली केंद्र सरकारने तयार केली आहे. उर्वरित ७५ टक्के लसींचा पुरवठा सर्व राज्यांना तेथील लोकसंख्येप्रमाणे मिळावा, असे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात लसींचे वाटप केले जात आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार निर्णय घेतले जात आहेत. आयसीएमआरच्या सिरो सर्व्हेनुसार, ६० टक्के लहान मुलांमध्ये अँटिबॉडी सापडल्या आहेत, असे अहवालात म्हटले आहे. त्यानुसार राज्याला काही सूचना मिळाल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
-----
...तर निर्बंध शिथिल!
ज्या ठिकाणी कमी रुग्ण सापडत आहेत, पॉझिटिव्हीटी रेट आणि मृत्युदर कमी झाला आहे, अशा जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध शिथील करता येतील का, याबाबत आरोग्य विभागाची अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना आणि टास्क फोर्सला हा अहवाल सादर केला जाईल. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
राज्यात दुसरी लाट येऊन गेली आहे. केंद्राकडून तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. पण आपण लसीकरणावर भर दिल्यास तिसऱ्या लाटेचा धोका नक्कीच कमी होईल, असेही टोपे यांनी सांगितले.
-----
गावोगावी मेडिकल युनिट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सर्वत्र अलर्ट दिले जात आहेत. त्यात काही उणिवा असल्यास सुधारणा केल्या जातील. गावोगावी मेडिकल युनिट तयार केले आहेत. या गावांना लसीकरणही प्राधान्याने व्हावे, याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे, असे टोपे म्हणाले.