पुणे : दररोज पंधरा ते वीस लाख नागरिकांना लस देण्याचे राज्याची क्षमता आहे.त्यामुळे राज्याला दर महिन्याला सुमारे तीन कोटी लस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र ,सध्या केवळ सव्वा कोटी उपलब्ध होत आहेत. केंद्र शासनाकडून लस उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढल्यास अधिकाधिक नागरिकांना कमीत कमी पहिला डोस देणे शक्य होईल, असं राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले.
सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय, सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधक केंद्रातील प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना आणि टेलिमेडिसिन सर्व्हिसेसच्या लोकार्पण समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते.
पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज
राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, या पाच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसेना. आजच्या तारखेला तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत याच जिल्ह्यांचा सत्तर टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केलंय. त्याअनुषंगाने या पाच जिल्ह्यांनी कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचं टोपे म्हणाले आहेत.
जागतिक विद्यापीठाच्या पहिल्या दोनशेमध्ये सिंबायोसिस
जागतिक विद्यापीठाच्या पहिल्या २०० विद्यापीठाच्या क्रमवारीत भारतातील एकाही विद्यापीठाचे नाव येत नाही.या क्रमांकावरीत सिंबायोसिसचा समावेश व्हावा,अशी अपेक्षा व्यक्त करून टोपे म्हणाले, सिंबायोसिसचे दोन्ही उपक्रम अनुकरणीय असून इतर खासगी रुग्णालयांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे.तसेच राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) ५ टक्के खर्च क्षेत्रावर होणे गरजेचे आहे. सध्या होणारा खर्च खूप कमी असून त्यात वाढ होण्याची आवश्यकता आहे.