राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील मधाचे उत्पादन वाढवून त्याच्या निर्यातीला चालना देण्याचा निर्धार केंद्रीय कृषी खात्याने केला आहे. शेतीला पूरक असा हा उद्योग असून राज्यात त्याला भरपूर वाव आहे.
केंद्र सरकारने यासाठी ‘हनी बी बोर्ड’ स्थापन केले आहे. देशातील सर्व राज्य सरकारांना केंद्राने यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यात शेतीला पूरक अशा या मधोत्पादन उद्योगासाठी शेतकऱ्यांमध्ये व एकूणच ग्रामीण भागात जागृती करावी अशी सूचना आहे. यासाठी लवकरच योजना जाहीर करण्यात येतील, असेही सूतोवाच करण्यात आले आहे.
देशातून सन एप्रिल २० ते फेब्रुवारी २१ या कोविडकाळात ५८९ कोटी रुपयांचा मध निर्यात केला. त्यामध्ये हरियानाचा वाटा सर्वाधिक म्हणजे २७२ कोटी (२५४६७ टन) रुपयांचा आहे. दुसऱ्या क्रमाकांवर पंजाब असून त्यांनी १६३ कोटी रुपयांचा (१८१३८ टन) मध निर्यात केला. महाराष्ट्राचा क्रमांक यात ९ वा आहे. फक्त २ कोटी रुपयांचा (८१टन) मध निर्यात झाला.
देशातील एकमेव केंद्रीय मधमाशी संशोधन केंद्र पुण्यात आहे. तरीही राज्यात फारसे मध उत्पादन होत नाही. मधमाशी पालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. त्यातून निर्यातक्षम असा मध मिळवता येतो. त्यामुळेच केंद्र सरकारने मधुक्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी मधमाशी पालनाला महत्त्व द्यावे, यासाठीचे आवश्यक ते संशोधन तसेच तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे म्हणून विशेष प्रयत्न करण्यास सर्व राज्यांना सांगितले आहे.
केंद्र सरकारही हनी बी बोर्ड स्थापन करणे, निर्यातीसाठी हनी बी नेट सुरू करून त्यावर मध उत्पादक शेतकऱ्यांची नोंद करून घेणे, त्यांना नेटवरून आवश्यक ती सर्व माहिती देऊन निर्यातक्षम मधाचे उत्पादन करून घेणे अशी कामे करत आहे. येत्या दोनतीन वर्षांतच मधोत्पादनात देशाला जगाच्या नकाशावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. --//
मधमाशी पालन हा उत्तम प्रकारचा शेतीपूरक व्यवसाय आहे. देशात यावर बरेच संशोधन झाले आहे. आता केंद्र सरकार याला प्राधान्य देत असेल तर चांगलेच आहे.
- कमलाकर क्षीरसागर- निवृत्त वैज्ञानिक, केंद्रीय मधमाशी संशोधन केंद्र, पुणे.
-----///
महाराष्ट्रात मध उत्पादनाला बराच वाव आहे. मधमाशी पालन करून उत्तम दर्जाचा मध मिळवता येतो. परदेशात याला फार मागणी आहे. आम्ही उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, राज्यस्तरीय निर्यात कक्ष