पुणे : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी एकाच दिवसात महाराष्ट्रात २ हजार कोटी ३८ लाख ८६ हजार रुपयांचे वाटप केले. राज्यातील १ कोटी १९ लाख ४ हजार २८४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे ही रक्कम जमाही झाली.
किसान सन्मान योजनेचा हा ११ वा हप्ता आहे. देशातील १० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे पंतप्रधानांनी आज एकाच दिवसात २१ हजार कोटी रुपयांचे वाटप केले. राज्यातील त्यापैकी २ हजार कोटी ३८ लाख ८६ हजार रुपये मिळाले. शेतकरी म्हणून शेतजमीन नावावर असणे, प्राप्ती कर जमा करणारा नसावा, सरकारी नोकरदार नसावा अशा काही अटी योजनेला पात्र होण्यासाठी आहेत.
शेतजमीन नावावर असलेल्या शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये देणारी ही योजना आहे. दर ४ महिन्यांनी यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात २ हजार रुपये जमा करण्यात येतात. सन २०१९ पासून केंद्र सरकार ही योजना राबवते आहे. योजनेतील ११ वा हप्ता आज पंतप्रधानांनी जमा केला. संगणकाच्या एका क्लिकवर एकाच वेळी देशातील लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर ही रक्कम तत्काळ जमा होत असते.
दरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार कार्डबरोबर जोडणे यात आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी ज्या बँकेत खाते आहे तिथे जाऊन त्यांना स्वत:चा आधार कार्ड क्रमांक द्यायचा आहे. आधार कार्ड असे जोडले नसेल तर यापुढे लाभार्थ्याला अपात्र समजले जाणार आहे. राज्यातील १ कोटी १९ लाख लाभार्थ्यांपेकी ८८ लाख जणांनी आपले कार्ड असे लिंक करून घेतले आहे. उर्वरित २० लाख लाभार्थ्यांनी आधार कार्ड लिंक करावे यासाठी राज्यात जिल्हा व तालुका निहाय मोहीम कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सांख्यिकी विनयकुमार आवटे यांनी दिली.