केंद्र सरकारनंच काळजी घेण्यास सांगितलंय; भाजप नेत्यांनी माहिती करून घ्यावं - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 01:50 PM2021-09-03T13:50:32+5:302021-09-03T13:50:38+5:30
परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र दिसल्यास राज्य सरकार मागणी पूर्वीच मंदिर सुरु करेल.
पुणे : मंदिरं उघडण्याबाबत राज्यात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन केली जात आहेत. कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत. पण मंदिरांचा विचार का केला जात नाही. असा सवाल इतर राजकीय पक्ष उपस्थित करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारकडे मंदिरत उघडण्याबाबत मागणीही केलीय. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पवार म्हणाले, सध्या राज्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र दिसल्यास राज्य सरकार मागणी पूर्वीच मंदिर सुरु करेल.
''केंद्र सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा अशी त्यांनी सांगितलंय. आम्हालाही नागरिकांच्या भावनांचा आदर आहे. सध्या राज्यात मंदिर उघडण्याबाबत भाजप आंदोलन करतं आहे. त्यांनी केंद्राने दिलेल्या सूचनांची माहिती करून घ्यावी. असंही ते यावेळी म्हणाले आहेत.''
सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन
पुणे शहर सोडलं तर ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्या भागातील नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ५ तालुक्यात रुग्ण अधिक आहेत. त्यामध्ये शाळा सुरु करणे हे सरकरसमोरील आव्हानच असणार आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतरच शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही पवार म्हणाले.
इंधन दरवाढीबाबत केंद्रावर टीका
दहा महिन्यापासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र, मोदी सरकारकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. हे जनतेचं दुर्दैव आहे. अशी टीका करतानाच इंधन दरवाढीवरुन अजित पवार यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. ते नियंत्रित करण्यासाठी केंद्राकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, असी टीका अजित पवार यांनी केली.