केंद्र सरकारला सत्तेचा उन्माद, लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना सत्तेबाहेर काढले पाहिजे- शरद पवार
By राजू इनामदार | Published: April 18, 2024 05:33 PM2024-04-18T17:33:14+5:302024-04-18T17:38:38+5:30
महाविकास आघाडीचे बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर व डॉ. अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आले....
पुणे : कोणी विरोध केला की त्याला तुरुंगात टाकले जात आहे. झारखंड, दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालचे मंत्री यांनाही सोडले नाही. लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार सुरू आहे. तो थांबवायचा असेल तर त्यांना सत्तेबाहेर काढायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. हे काम करण्याची जबाबदारी तुमची-आमचीच आहे, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीचे बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर व डॉ. अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी रास्तापेठेत जाहीर सभा झाली. त्यात पवार यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, जयंत पाटील, अशोक पवार, रोहिणी खडसे, संग्राम थोपटे, संजय जगताप, सुषमा अंधारे, मदन बाफना, मोहोळ, सचिन अहिर, रोहित पवार असे तीनही प्रमुख घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व तीनही उमेदवार यावेळी उपस्थित होते.
त्यांना सत्तेबाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही
पवार म्हणाले, ‘महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र त्यांनी ते दुर्लक्षित केले. सन २०१४ ला ते महागाई कमी करू असे म्हणत सत्तेवर आले. त्यानंतर १० वर्षे झाली. त्यावेळी ४१० रुपये असलेला गॅस सिलिंडर १ हजार १६० रुपये झाला. पेट्रोल ७१ रुपये लिटर होते ते १०६ रुपये झाले. आश्वासने द्यायची व ती विसरायची, त्यावर काहीच करायचे नाही, असे चालले आहे. सत्तेचा उन्माद काय असतो ते केंद्र सरकार दाखवत आहे. अशा स्थितीत लोकशाही वाचवायची असेल तर त्यांना सत्तेबाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही.’
पराभवाच्या भीतीमुळे सत्ताधारी सैरभैर-
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘भाजपच्या जाहीरनाम्यात एकट्या मोदी यांचेच ४८ फोटो आहेत. पेट्रोल पंपावर त्यांचेच फोटो. इतकेच काय, कोरोनाच्या लस प्रमाणपत्रावरही त्यांचे फोटो होते. फोटो लावले नाहीत तर लोक आपल्याला विसरतील याची भीती त्यांना आहे. पराभव होणार याची खात्री पटल्यामुळेच ते काहीही करत आहेत.’ माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांनीही यावेळी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. जनहिताचे कोणतेही काम करणे त्यांना १० वर्षांत शक्य झालेले नाही. लोकांनी आता त्यांना बरोबर ओळखले आहे, असे ते म्हणाले.
आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तसेच आम आदमी पार्टी व अन्य संस्था, संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते सभेला उपस्थित होते. थेट सभेच्या व्यासपीठाजवळ आणलेल्या गाडीतूनच शरद पवार यांचे आगमन झाले. घोषणा देत त्यांचे स्वागत करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक अजित दरेकर यांनी आभार व्यक्त केले.