पुणे : पुणे शहरातील कात्रज परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्र सरकारच्या जेएपीटी योजनेच्या अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. महापालिका उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी मदत जाहीर झाल्याने या विषयावरून राजकारण पेटणार आहे.
पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला परवानगीसाठी अनेक वर्ष लढा द्यावा लागला आहे. अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत कोथरूड ऐवजी चांदणी चौकात शिवसृष्टी उभारणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या निर्णयामुळे शहरात आनंद व्यक्त होत असताना आठवड्याच्या आत पुरंदरे यांच्या शिवसृष्टीलाही मान्यता देण्यात आली होती . त्यामुळे एकाच शहरात दोन शिवसृष्टी उभारण्यात येणार आहेत. त्यावरून नाराजी असतानाच पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला निधी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष भाजपला टार्गेट करण्याची शक्यता आहे. एकीकडे महापालिकेच्या शिवसृष्टीच्या भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसऱ्या शिवसृष्टीला निधी मिळून गती येणार असल्याने विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची चिन्हे आहेत. दरम्यान येत्या रविवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय कार्यालयात पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे समजते.