पुणे : आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारने घाट घातला आहे. म्हणून केंद्र सरकार हे राज्य सरकारवर बंधने घालण्याचा प्रयत्न करत आहे. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जातनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्या केंद्र सरकार असो राज्य सरकार दोघांनाही घरी आल्यास उभे करू नका, त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण परिषदेचे निमंत्रक तथा माजी मंत्री अण्णा डांगे यांनी पुणे येथे केले.
महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण परिषदेचे वतीने राज्यातील विविध संस्था, संघटनांची आणि सर्वपक्षीय नेत्यांची पुण्यातील भारती विद्यापीठ येथे एकदिवसीय ‘धनगर आरक्षण परिषद’ आयोजित करण्यात आली होती. राज्यातील ३६ संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपिस्थित होते. ‘धनगर आरक्षण परिषद’ समारोपप्रसंगी अण्णा डांगे बोलत होते.
डांगे म्हणाले, की धनगर समाजाच्या ३२ पोटजाती आहेत. त्यातील ३ पोटजातींचा आधीच अनुसूचित जमातीत समावेश केला आहे. उर्वरित २९ पोटजातींना केवळ ‘धनगड’ आणि ‘धनगर’ असा शब्दछेल करत दुर्लक्षित ठेवले आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड आदी राज्यातील धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व सोयीसुविधा लागू आहेत. यापुढे पोटजाती सांगूच नका, कोणीही आले तर त्यांना सांगा आम्ही धनगर आहोत. ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हा भाषेचा विषय आहे, भारतीय राज्यघटनेत दोन्ही एकच असल्याचा उल्लेख असल्याचा शासनानेच जाहीर केले आहे. धनगर महासंघाकडेही त्याचे सर्व पुरावे आहेत.