पुणे : रशिया युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत, मात्र ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री अश्वीनकुमार चौबे यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्ता बैठकीसाठी शुक्रवारी चौबे आले होते. तत्पुर्वी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी महागाई कमी करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असल्याचे सांगितले. युद्धामुळे जगातील सर्वच देशांमध्ये महागाई वाढली आहे, भारत त्याला अपवाद असणार नाही. इथेही वाढते आहे, त्यावर आम्ही नियंत्रण मिळवतो आहोत. त्यासाठी काही गट स्थापन केले आहेत. पण राज्य सरकारांचीही यात मोठी जबाबदारी आहे. काही कर कमी करून ते यावर नियंत्रण ठेवू शकतात.
खाद्य तेल, गॅसच्या दरांवर नियंत्रण आणतो आहोत. बऱ्याचशा गोष्टी आपण बाहेरून घेत असतो. त्यामुळे या प्रयत्नांना मर्यादा येतात. शिधापत्रिकेवर धान्य व्यवस्थित कसे मिळेल यासाठी आपण बायोमेट्रिक पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे या योजनेतील भ्रष्टाचाराला आळा बसला असा दावा चौबे यांनी केला. धान्य तसेच जीवनावश्यक वस्तू बाजारपेठेत उपलब्ध राहतील, त्याचा कोणी साठा करणार नाही याची काळजी घेत आहोत. राज्य सरकारांनी अशा वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे कळवण्यात आले आहे असे चौबे यांनी सांगितले.
बिहारमधील भाजपाच्या सत्तेत तिथे कोणीही एकत्र आले तरीही काही फरक पडत नाही. कोणकोणाला भेटत असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. ती चांगलीच गोष्ट आहे, मात्र त्यामुळे भाजपाच्या तेथील सत्तेमध्ये बदल होईल, काही उलथापालथ होईल असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे असे चौबे म्हणाले.