पुणे : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून 'स्मार्ट सिटी' योजनेकडे पाहिले जाते. तसेच, पंतप्रधान मोदी यांनी २०१४- १५ साली पुण्यात स्मार्ट सिटी योजनेचे अगदी धूमधडाक्यात उद्घाटन देखील केले होते. मात्र, आता केंद्र सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते व माजी आमदार मोहन जोशी यांनी पुण्यात केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्यासह देशभरातील १०० शहरांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील पुण्यासह १० शहरे आहेत. मात्र, जून २०२१ मध्ये या योजनेची मुदत संपत आहे. पुण्यासह सर्वच शहरे स्मार्ट सिटी योजनेला मुदतवाढ मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारची देशभरातील स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या व नियोजित कामांना कोणत्याही प्रकारचा निधी दिला गेला नाही. यावरून ही योजना लवकरच केंद्र सरकार गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे दिसते आहे असा आरोप काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी केला आहे.
चौकट
प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत मार्गी लावण्याचे आदेश
स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव कुणालकुमार यांनी राज्यातील सर्व सीईओंची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहे. रखडलेले सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे. मार्च २०२२ पर्यंत हाती असलेले सर्व प्रकल्प मार्गी लावावेत. यानंतर योजनेला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याची त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.