लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कोंडी करून राजकारण साधण्याचा निंद्य प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. त्याला पुण्याचे म्हणवणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर साथ देत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची राज्यावरील टीका हाही त्याचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
जावडेकर पुण्याचे रहिवासी आहेत. त्यांचेच गिरीश बापट इथे खासदार आहेत. पुण्यात त्यांचे ४ आमदार आहेत, त्यातले चंद्रकांत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पालिकेत सत्ता भाजपाचीच आहे, तरीही पुण्यासाठी काहीही न करता भाजपाचे हे सगळे सत्ताधारी राज्य सरकारवर टीका करत आहेत. यातून कोरोना काळातही राजकारण करण्याची त्यांची सत्तापिपासू वृत्तीच दिसत आहे, असे जोशी म्हणाले.
जावडेकर यांनी दिल्लीत बसून राज्य सरकारचा राजीनामा मागण्यापेक्षा पुण्याला मदत मिळवून द्यावी. प्रदेशाध्यक्ष पाटील यांंनी काळाचे थोडे तरी भान ठेवावे व महापालिका पदाधिकाऱ्यांनी शहरातील आरोग्यसेवा कार्यक्षम करावी, असे अपेक्षित असताना जावडेकर पुण्यात फिरकत नाहीत, खासदार बापट कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर आंदोलन करतात व पालिका पदाधिकारी खिसे भरणारी विकासकामे करण्यात मग्न आहे याला काय म्हणावे, असा प्रश्न जोशी यांनी केला.
देशाचा विचार करता कोरोना साथीचे थैमान पुण्यात सर्वाधिक आहे, याचे गांभीर्य ओळखून केंद्राकडून अधिकाधिक मदत होईल याची दक्षता जावडेकर यांनी घ्यायला हवी होती. पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडून जावडेकर यांनी शहरातील व्यवस्थेची माहिती घ्यायला हवी होती. हे न करता राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी जावडेकर करतात यामागे कुटील डाव आहे, असा आरोप जोशी यांनी केला. भाजपाचे हे संकटकाळातील राजकारण पुणेकर कधीही विसरणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा जोशी यांनी दिला.