पुणे : क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा तपास उत्कृष्टरित्या करणा-या पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन अधिका-यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून दरवर्षी गुन्हयांचा उत्कृष्ट तपास करणा-या तपासी अधिका-यांना ’केंद्रीय गृहमंत्री पदक’ दरवर्षी दिले जातात. याकरिता महाराष्ट्र पोलीस दलास दरवर्षी एकूण 11 पदके प्रदान केली जातात. पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून क्लिष्ट आणि अतिशय गंभीर गुन्हयाचा तपास करणा-या एकूण 4 तपास अधिकारी यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र शासलाला पाठविण्यात आला होता. त्यापैकी तीन तपासी अधिका-यांना हे पदकजाहीर झाले आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे लोणावळा शहर येथे प्रभारी अधिकारी असताना दरोडयाच्या गुन्हयात मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळी असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा आरोपींना मध्यप्रदेशमधून अटक करण्यात आली होती. गुन्हा घडल्याच्या तारखेपासून अहोरात्र परिश्रम करून त्यांनी दहा दिवसांच्या आत गुन्हयाची उकल केली. पवार यांच्या पथकाने एकूण 15 आरोपींना अटक क्रून गुन्हयातील 30 लाख 52 हजार 200 रुपये किंमतीचा रोख रक्कम आणि मुददेमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे शिरूर येथे प्रभारी अधिकारी होते. तेव्हा बँक आॅफ महाराष्ट्र, पिंपरखेड ता. शिरूर या ठिकाणी बँकेचे कर्मचारी व हजर ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवून एकूण 824 तोळे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 32 लाख 52 हजार 560 रूपयांचा ऐवज आरोपींनी लुटून नेला होता. हा गुन्हा उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. या गुन्हयाचा शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास करून 2 कोटी 36 लाख 42 हजार 960 रूपयांचा मुददेमाल हस्तगत 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे वेल्हा येथे प्रभारी अधिकारी असताना कातकरी समाजाची एक लहान मुलगी हरविल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. मुलगी मयत स्थितीत आढळून आली होती. या मुलीच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार होऊन ती मयत झाल्याचा अभिप्राय दिला होता. या गुन्हयास पॉक्सो कायदयांतर्गत वाढीव कलम लावण्यात आले होते. सी.सी टीव्ही फुटेक आणि साक्षीदार यांच्याकडूनमिळालेल्या माहितीनुसार आरोपीला 48 तासात जेरबंद केले. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला आणि या गुन्हयात आरोपीला 28 फेबृवारीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.