बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या सरकारला बहिणी आठवल्या. हे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात गुन्हेगारी वाढली. याबाबतचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह खात्याने दिला आहे. स्वर्गीय आर.आर.पाटील गृहमंत्री असताना महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत नव्हते. त्यांना जे जमले ते गृहमंत्री देवेंद्र फडवणीस का करु शकत नाहीत. गृहमंत्री फडवणीस घर पक्ष फोडा, ईडी, भ्रष्टाचार, कॉन्ट्रॅक्टर, दिल्ली दौऱ्यातच व्यस्त आहेत, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर निशाणा साधला. नित्कृष्ट कामामुळे मालवण येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याशिवाय राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासाठी बारामतीत सुळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.सुळे यांनी राज्य सरकारवर यावेळी जोरदार टीका केली.त्या पुढे म्हणाल्या,सत्ताधाºयांचे खुर्चीवर आणि कॉन्ट्रॅक्टर वर अधिक प्रेम आहे, बहिणींना पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे.१५०० रुपयांच्या किंमतीचे स्टीकर यांनी बहिण भावाच्या नात्याला लावले आहे. राज्यातील महिलांवर होत असलेल्या अत्याचारा संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे सुळे म्हणाल्या.
राज्यामध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार ही चिंताजनक बाब आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी या सरकारची आहे. दुदैर्वाने बदलापूर घटनेमध्ये लोक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकार जागे झाले. पीडित मुलीवर अत्याचार करणाºया नराधमाला या सरकारने जर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशी दिली असती, तर राज्यातील प्रत्येक महिलेने या सरकारला ओवाळले असते, मुख्यमंत्र्यांना ओवाळण्यासाठी मी स्वत: गेले असते. राज्यातील इतर ठिकाणीही महिलांवर होत असलेले अत्याचार गंभीर आहेत.महाराष्ट्रात वाढलेली गुन्हेगारी गंभीर असल्याने देवेंद्र फडणवीस यांचे गृह खाते याला जबाबदार आहे.गृहमंत्री फडवणीस यांच्याकडुन खुप अपेक्षा होत्या.पोलीसांवर झालेल्या कोयता हल्लयाचा उल्लेख सुळे यांनी यावेळी केला.त्या म्हणाल्या, ज्या ठीकाणी पोलीस सुरक्षित नाहित,त्या ठीकाणी जनतेचे काय.या मध्ये पोलीसांची चुक नाही.कारण वर्दीची भीतीच राहिलेली नसल्याचा आरोप खासदार सुळे यांनी यावेळी केला.मुलींना मोफत उच्च शिक्षणाची केवळ घोषणा करण्यात आली.मात्र,याबाबतचा अधिकृत परीपत्रक अद्याप काढले नसल्याचे सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मान आम्ही राखतो, असे सांगून राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, मावळमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपीला आम्ही दोन महिन्यात फाशी दिली, कधी आणि कोणाला फाशी दिली हे त्यांनी दाखवावं, मी स्वत: महिलांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा मी जाहीर सत्कार करेन, असे आव्हान त्यांनी यावेळी बोलताना दिले.