Baramati: केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर काटेवाडी; दोन ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 12:25 PM2021-10-07T12:25:57+5:302021-10-07T13:25:13+5:30
दरम्यान, कालच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर खासगी साखर कारखानदारीवरुन निशाणा साधला आहे (Income tax raid in Pune, it raid pune, ajit pawar)
बारामती: एमआयडीसीतील एका बड्या कंपनीसह तसेच तालुक्यातील काटेवाडी येथील एका खासगी कारखान्याशी संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराची केंद्रीय तपास यंत्रणांनी भेट देत पाहणी केल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये काटेवाडी येथील हे पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचे निकटवर्तीय असून नगर जिल्ह्यातील खासगी कारखान्याशी संबंधित आहेत.
गुरुवारी (दि ७) सकाळी ६.३० वाजताच काटेवाडीत तीन गाड्या या ठिकाणी पोहचल्या. बारामती—इंदापूर रस्त्यालगत असणाऱ्या संबंधित पदाधिकाऱ्याच्या घरासमोर या गाड्या थांबल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या त्या पदाधिकाऱ्याचे चुलत भाऊ, अन्य कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी संबंधितांनी त्या अधिकाऱ्यांनी ते पदाधिकारी या ठिकाणी सध्या राहत नसल्याचे सांगितले.
तसेच त्यांचे कुलुपबंद घर त्या तपास अधिकाऱ्यांना दाखविल्याची चर्चा आहे. त्यानंतर या ठिकाणी एका स्टेनगनधारी कर्मचाऱ्याला या घरासमोर थांबवून इतर अधिकारी बारामतीच्या दिशेने निघून गेले. मात्र, तो स्टेनगनधारी सुमारे तास दीड तास त्या पदाधिकाऱ्यांच्या बंद घरासमोर थांबला. त्यांनतर येथील एका उपहारगृहात नाष्टा करुन तो स्टेनगनधारी या ठिकाणी थांबविण्यात आलेल्या ‘इनोव्हा’ गाडीतून निघून गेला. तपास यंत्रणांनी दिलेल्या भेटीबाबत तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, आयकर विभागाच्या अधिका-यांनी ही चौकशी सुरु केल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र,संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने भल्या सकाळी गाव साखर झोपेत असतानाच भेट दिल्याने याबाबत दुजोरा मिळालेला नाही. नाव न छापण्याच्या अटीवर काटेवाडी येथील ग्रामस्थांनी आज सकाळी केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या भेटीबाबत सांगितले. येथील स्थनिक पोलिसांनाही या तपासाबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.
दरम्यान, कालच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर खासगी साखर कारखानदारीवरुन निशाणा साधला आहे. जरांडेश्वर बाबत देखील सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या यांनी बारामती सोडून अद्याप २४ तास देखील उलटले नाहीत. त्यानंतर अवघ्या १० ते १२ तासात केंद्रीय तपास यंत्रणांनी या ठीकाणी भेट देत तपास सुरु केला आहे. हा निव्वळ योगायोग की यामागे काही धागेदोरे असल्याची चर्चा रंगली आहे.