पुणे : कोलकात्ता येथील एन.आर.एस महाविद्यालयाच्या रूग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ला तसेच भारतभर डॉक्टरांवर होणारे अमानुष हल्ले रोखण्यासाठी एकच केंद्रीय कायदा करावा तसेच डॉक्टरांचे खटले ‘फास्ट ट्रक’ न्यायालयात चालवावेत अशा मागण्या इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएतर्फे सोमवारी पुकारलेल्या बंदला पुण्यात वैद्यकीय संघटना आणि रूग्णालयांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील काही रूग्णालय, क्लिनिक, दवाखाने यांच्या वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक सेवा वगळता) 24 तासासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. आयएमएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांवरील हल्ल्याच्या गंभीर परिस्थितीबाबत विचार विनिमय करून ठोस उपाययोजना करण्यासाठी सोमवारी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमधील निर्णयासंदर्भात पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी सर्व वैद्यकीय संघटनांचे प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. संजय गुप्ते, डॉ. जयंत नवरंगे, डॉ, अविनाश भुतकर, डॉ. दिलीप सारडा, आयएमचे डॉ. आरती निमकर, डॉ. बी.एल देशमुख, डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. आशुतोष जपे उपस्थित होते. गेल्या वर्षभरात पुण्यात 501 डॉक्टरांना धमक्या दिल्याच्या तक्रारी असून, 10 डॉक्टरांवर शारीरिक हल्ले झाले आहेत. दिवसागणिक डॉक्टरांवरील शाब्दिक अत्याचार आणि मारामारीच्या घटना घडत आहेत. पण प्रत्येकाची नोंद होत नाही. आता या घटना नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.’आम्ही तुम्हाला पैसे मोजतो म्हणजे तुम्ही आम्हाला सेवा द्यायलाच पाहिजेत अशी एक मानसिकता निर्माण झाली आहे. समाजात हिंसकता वाढत आहे. पूर्वी डॉक्टरांना देव मानले जायचे पण आता त्यांना मारायला देखील लोक कमी करीत नाही. हेच डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी एकच सेंट्रल कायदा करावा. या कायद्याअंतर्गत 7 ते 14 वर्षाच्या शिक्षेची तरतूद असावी. ज्यायोगे हल्लेखोरांवर वचक बसू शकेल अशा आमच्या मागण्या असल्याचे डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले.इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेसोबत सर्वच स्पेशालिस्ट डॉक्टर्स, छोटी मोठी रूग्णालये तसेच सर्व वैद्यकीय संघटना उदा: पुणे स्त्रीरोग तज्ञ संघटना, पुणे नेत्रतज्ञ संघटना, बालरोग तज्ञांची संघटना, असोसिएशन आॅफ फिजिशियन पुणे आदी विविध वैद्यकीय संघटनांनी वैद्यकीय सेवा 24 तास बंद ठेवून सक्रिय पाठिंबा दर्शविला असल्याचे सांगण्यात आले. --------------------------------------------
डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची ‘आयएमए’ची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 8:06 PM
शहरातील काही रूग्णालय, क्लिनिक, दवाखाने यांच्या वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक सेवा वगळता) 24 तासासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
ठळक मुद्देगेल्या वर्षभरात पुण्यात 501 डॉक्टरांना धमक्या दिल्याच्या तक्रारी, 10 डॉक्टरांवर शारीरिक हल्लेदिवसागणिक डॉक्टरांवरील शाब्दिक अत्याचार आणि मारामारीच्या घटना