लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्वमध्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा किनारपट्टीवर असलेला चक्रीय चक्रवात आता आग्नेय अरबी समुद्रावर आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ईशान्यकडून येणारे उष्ण वारे हे मध्य महाराष्ट्रापासून कोकणापर्यंत जाणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, कोकण तापणार असल्याचा पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ३९.२ अंश सेल्सिअस आणि सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १४.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
कोकणात आजच्या तापमानात वाढ झाली आहे. रत्नागिरी येथे कमाल ३७.७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझला ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ती सरासरीच्या तुलनेत ५.६ अंश आणि ३.९ अंश सेल्सिअसने अधिक आहे.
मध्य महाराष्ट्रातही अनेक शहरातील कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भात काही ठिकाणच्या कमाल तापमानात ४ अंशांहून अधिक वाढ झाली आहे.
हवेतील खालच्या स्तरातील वारे सध्या उत्तरेकडून ईशान्यच्या दिशने वाहत आहे. ईशान्यकडील हे वारे घड्याळाच्या दिशेने मध्य महाराष्ट्रसह कोकणापर्यंत येत आहे. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, कोकणात दिसू लागला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३६.१, लोहगाव ३६.६, जळगाव ३८.४, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर ३०.५, मालेगाव ३८.६, नाशिक ३५.८, सांगली ३७.८. सातारा ३६.२, सोलापूर ३८.८, मुंबई ३२.८, सांताक्रुझ ३६.३, अलिबाग ३१.६, रत्नागिरी ३७.७, पणजी ३४, डहाणु ३१.१, औरंगाबाद ३५.८, परभणी ३७.२, नांदेड ३३, अकोला ३८.९, बुलढाणा ३६.३, चंद्रपूर ३९.२, गोंदिया ३६.२, नागपूर ३७.८.