पुणे : मध्य रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकावर यापुढे केवळ ‘रेलनीर’ हे बाटलीबंद पाणीच उपलब्ध असणार आहे. इतर कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकण्यास पुर्णपणे मनाई करण्यात आली आहे. तसेच पुणे विभागातील इतर स्थानकांवरही पुढील काही दिवसच इतर कंपन्यांचे मिळणार आहे. त्यामुळे इतर कंपन्यांचे पाणी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.
भारतीय रेल्वेने ‘रेलनीर’ हा स्वत:चा ब्रँड तयार केला आहे. देशभरातील रेल्वेस्थानकावर या नावानेच बाटलीबंद पाण्याची विक्री केली जाते. मात्र, पुणे स्थानकासह अनेक रेल्वेस्थानकांवर इतर कंपन्यांचे पाणीही मिळत आहे. अनेक स्थानकांवर रेलनीरला प्रवाशांकडून प्रतिसादही मिळत आहे. या पार्श्वभुमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ‘रेलनीर’ला अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. विभागातील सर्वच स्थानकांवर आवश्यकतेनुसार रेलनीर उपलब्ध करून दिले जात आहे. पुणे स्थानकावर हेच पाणी विकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त इतर कंपन्यांचे पाणी विकण्यास मान्यता देण्यात आलेली नाही.
पुणे स्थानकाव्यतिरिक्त इतर स्थानकांवर काही कंपन्यांचे पाणी दि. २० नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्याने बंद केले जाणार आहे. त्यानंतर या स्थानकांवरही केवळ ‘रेलनीर’ उपलब्ध असेल. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनिल मिश्रा व वाणिज्य व्यवस्थापक सुरेशचंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली स्थानके व गाड्यांमध्ये वाणिज्य निरीक्षकांची टीम नेमण्यात आली आहे. गाड्या तसेच स्टॉलवर रेलनीरची विक्री करण्यासाठी विक्रेते व प्रवाशांमध्ये जागृती केली जात आहे. रेल्वे प्रवाशांनीही अधिकृत विक्रेत्यांकडूनच रेलनीर हे पाणी घ्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.