पुणे : मध्य रेल्वेकडून डोंबिवली ते कल्याण स्थानकादरम्यान ठाकुर्ली स्थानकावर दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ या कालावधीत पादचारी पुल उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे यादिवशी डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, कोल्हापुर सह्याद्री एक्सप्रेससह अन्य काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या अंशत; रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पादचारी पुल उभारणीसाठी मध्य रेल्वेकडून ख्रिसमस दिवशी पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे डोंबिवली ते कल्याण दरम्यानची लोकल सेवा सकाळी ९.१५ ते १.४५ दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान २० मिनिटांच्या अंतराने कल्याण-कर्जत, कसारासाठी तर सीएसटी आणि ठाणे, डोंबिवलीदरम्यान १५ मिनिटांनी विशेष गाड्या सोडण्यात येतील. ब्लॉकचा परिणाम अनेक लांबपल्याच्या गाड्यांवरही होणार आहे. त्यामध्ये मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस, तसेच मुंबई-भुसावळ पॅसेंजर, मुंबई-कोल्हापुर सह्याद्री एक्सप्रेस या पुण्यातून धावणाऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दि. २४ डिसेंबर रोजी कोल्हापुर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस धावणार नाही. ही गाडी दि. २५ डिसेंबर रोजी कर्जत, पनवेल, दिवामार्गे धावेल.
नांदेड एक्सप्रेस, नागरकोईल एक्सप्रेस व हैद्राबाद एक्सप्रेस या गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्ग धावतील. या गाड्यांना कल्याणसाठी दिवा येथे थांबा देण्यात येईल. पुणे-भुसावळ एक्सप्रेसला दौंड-मनमाडमार्गे वळविण्यात आले आहे. यांसह आणखी काही गाड्यांना विविध थांब्यांवर काही काळ थांबवून ठेवण्यात येणार आहे. तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.