लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अस्सल खादीचे कपडे, पंचे आणि इतर साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण असणारे पुण्यातील शनिपार चौक येथील ‘गोरे आणि मंडळी’ ऊर्फ पंचेवाले गोरे येत्या ३० ऑगस्टला शतकपूर्ती करत आहेत. पूर्वजांचा वारसा चालवण्यासाठी चौथ्या पिढीतील आश्लेषा गोरे आणि मौसमी गोरे-घैसास या महिलांनी पूर्वजांचा वारसा जतन केला आहे. सन १९२५ मध्ये पुणे महापालिकेने महात्मा गांधी यांचा सत्कार समारंभ ठेवला होता. त्यावेळी गांधीजींनी ‘गोरे आणि मंडळी’ या दुकानास भेट दिली होती.
‘पंचेवाले गोरे’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘गोरे आणि मंडळी’ या दुकानाची स्थापना पटवर्धन वाड्यात सन १९२१ मध्ये श्रीधर महादेव गोरे यांनी केली. तेव्हापासूनच हे दुकान धोतर, पंचे, सोवळे, उपरणे, शेले, शाली, पगड्या याबरोबरच खण, इरकल अशा पारंपरिक कापडापासून तयार केलेले लहान मुलींचे परकर पोलके, कपड्यांसाठी ओळखले जाऊ लागले. तयार नऊवार व सहावार साड्या, मुलांचे व पुरुषांचे कुर्ते अशा विविध वस्तूंसाठीही ओळख निर्माण झाली. शांता शेळके, राजा गोसावी अशा अनेक दिग्गजांनी दुकानाला भेट दिली आहे. शतकपूर्तीच्या दिवशी पेढे आणि फुले देऊन येणाऱ्यांचे स्वागत करणार असल्याचे श्रीधर गोरे यांचे नातू डॉ. धनंजय गोरे यांनी सांगितले.