भोर - ग्रामीण भागामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ब्रिटिश राजवटीमध्ये दुरदृष्टी ठेवून सुरू करण्यात आलेली वाचनचळवळ शतकानंतरही सुरू आहे. भोर तालुक्यामध्ये अद्यापही वाचनालये आणि ग्रंथालयांची संख्या अद्यापही कमी आहे. मात्र, भोरचे हे ‘ज्ञानभूषण’ असलेले श्रीमंत गंगुताईसाहेब पंतसचिव वाचनालय दिमाखात उभे आहे. या ग्रंथालयाचा फायदा विद्यार्थी, नागरिक, अभ्यासक घेत आहेत.शनिवारी (दि.९ जून) वाचनालयाला १०० वर्षे पुर्ण झाली. श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव यांनी ९ जून १९१८ रोजी सार्वजनिक वाचनालय सुरू केले. त्या काळी दोन हजार रुपयांची पुस्तके, ३00 रुपयांसह कपाट व साहित्य देऊन वाचनालय सुरू करण्यात आले. लोकवर्गणीतून ३00 रुपये जमा करण्यात आले. या वाचनालयात सुरुवातीला फक्त पुस्तकेच होती. नंतर वृत्तपत्रे सुरु करण्यात आली. शहराची लोक संख्या वाढल्यावर वाचकांची संख्याही वाढत गेली. यामुळे वाचनालयाची जागा अपुरी पडू लागली.त्यामुळे बाबासाहेबांनी २५ हजार रुपये आणि स्वत:ची जागा देऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इमारत बांधून दिली. इमारतीचा पाया १९२८ मध्ये त्या वेळचे कमिशनर जी. डब्ल्यू. हॅच यांच्या हस्ते झाला. तर इमारतीचे उद्घाटन ८ मे १९२८ रोजी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून रा. ब. अंजनगावकर होते. संस्थेच्या सभासदांमधून निवड झालेल्या संचालकांकडून वाचनालय व संस्थेचा कारभार सुरू आहे.\ वाचनालयात सुमारे ३८ हजार पुस्तके आहेत. विविध प्रकारची ग्रंथसंपदा आहे. त्यात कादंबरी, चरित्र, ललित, वाङ्मय, कथासंग्रह, काव्यसंग्रह, विज्ञानविषयक, आध्यात्मिक, इतिहास, रहस्यमय, संदर्भ ग्रंथ, इंग्रजी, संस्कृत पुस्तकांचा समावेश आहे. तर बालवाङ्मय पुस्तकांची संख्या सहा हजारांवर आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसचे १०० वर्षांपूर्वीच्या विविध विषयांवर एनसाइक्लोपीडिया ब्रिटनिकाच्या ३० दुर्मिळ खंडांचा समावेश आहे. मुक्त वाचनालयात १९ वृत्तपत्रे, १० साप्ताहिके व पाक्षिके, ६० मासिके उपलब्ध करून दिली आहेत.
वाचनसंस्कृती रुजविणाऱ्या वाचनालयाची ‘सेंच्युरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 1:46 AM